जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील रुग्णालयांमधून निघणारे मेडिकल वेस्ट साठवून ठेवलेल्या उस्मानिया पार्क परिसरातील गोदामाला आग लागली. या आगीत साठविलेले सर्व मेडिकल वेस्ट जळून खाक झाले. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास लागलेली ही आग मंगळवारी पहाटे तीन वाजता नियंत्रणात आली. महापालिकेच्या ९ बंबांनी पाण्याचा मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानिया पार्क परिसरतील गोदामात रुग्णालयातील वेस्ट मटेरिअल जमा केले जाते. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मनपा अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. या बंबांनी आग विझविण्यास सुरुवात केली. तीन बंब संपले तरी आग नियंत्रणात येत नव्हती त्यामुळे एका पाठोपाठ एक बंब पुन्हा पाठवून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तब्बल नऊ बंबांद्वारे पहाटे तीन वाजता ही आग नियंत्रणात आली. आगीवर रात्रभर पाण्याचा मारा केला जात होता. मात्र तोपर्यंत गोदामात जमा झालेले सर्व मेडिकल वेस्ट जळून खाक झाले होते. मंगळवारी दुपारपर्यंत किरकोळ स्वरुपाची धग कायम होती. तीदेखील अग्नीशमन विभागाने बंब ठेवून विझवली.