जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
जिल्ह्यातील केळी उत्पादकांना पीकविमा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगावचे जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. केळी पीकविमा संदर्भात विमा कंपनीने केलेल्या दिरंगाईबाबत कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जातीने लक्ष देण्याचे निर्देश देखील खासदारांनी दिले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, कृषी विभागाचे प्रतिनिधी सोनू कापसे आदी उपस्थित होते. हवामानावर आधारीत फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे विमा प्रस्ताव ‘एमआरसॅक’च्या अहवालातील माहिती व छायाचित्रांच्या आधारे नामंजूर करण्यात आले आहेत. शेतात केळी लागवड असतानाही विमा प्रस्ताव नामंजूर करणाऱ्या विमा कंपनीमुळे अनेक गावे आणि शेतकरी पीकविमा भरपाईपासून वंचित राहिले आहेत. ‘एमआरसॅक’चा अहवाल तयार करताना व शेतकऱ्यांना देय असलेली नुकसान भरपाई फेटाळताना खूप मोठी अनागोंदी झाली आहे.
याकडे लक्ष वेधून संबंधित विमा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी यापूर्वीच केली आहे. त्यानंतर आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार श्री.पाटील यांनी केळी उत्पादकांसाठी जिव्हाळ्याचा बनलेला पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनीही ॲक्शन मोडवर येऊन केळी विमा प्रश्नी जातीने लक्ष घालण्याची ग्वाही दिली.