जळगाव मिरर | १४ नोव्हेबर २०२३
देशभरात दिवाळीचा उत्साह सुरु असतांना सुट्टीवर फिरण्यासाठी जाणाऱ्याच्या अपघाताची देखील अनेक घटना घडत आहे. अशीच एक भयानक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिल्याने या अपघातात ६ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुझफ्फरनगर परिसरात घडली.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता, की सहाही तरुणांचे मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. अथक प्रयत्नानंतर कटरच्या सहाय्याने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. ऐन दिवाळीत ६ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
शिवम त्यागी, परश शर्मा, कुणाल शर्मा, धीरज, विशाल आणि त्याचा मित्र, अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शाहदरा परिसरातील रहिवासी होते. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते बाहेर फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी दिल्ली-डेहराडून महामार्गावर छपरजवळ त्यांच्या कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.