जळगाव मिरर | ७ मार्च २०२४
पारोळा शहरातील किसान महाविद्यालयाजवळ सकाळी ओमिनी कारमध्ये गॅस भरताना भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये ओमीनी जळून खाक झाली असून नागरिकांनी द बर्निंग कारचा थरार अनुभवला. या घटनेत चालक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील किसान कॉलेज समोरील साने गुरुजी नगर परिसरात रमेश भिवसन चौधरी (वय ५५, रा. पारोळा) हे घरगुती लागणारे गॅस हे अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओमिनी गाडी मध्ये भरत होते. गॅस भरतांना अचानक आग लागली आणि वाहनात भरलेल्या गॅसने पेट घेतला. काही वेळातच आगीने रुद्ररूप धारण केले. आगीचे लोड बाहेर पडू लागले आणि काही वेळातच कार जळून खाक झाली. सुमारे अर्धा तासापर्यंत आगीचा थरार परिसरातील रहिवाशांनी अनुभवला यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये रमेश भिवसन चौधरी हे किरकोळ जखमी झाले आहेत. पारोळा येथील अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्या आणली. घटनेची माहिती मिळतच पोलीस आणि पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
याठिकाणाहून अकरा सिलेंडर जप्त केले आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात पुरवठा निरीक्षक आर. व्ही. महाडिक यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या दोन महिन्यातली ही दुसरी गंभीर घटना असल्याने प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.